Friday, July 24, 2020

Manjula Pajal Aapla Vila - मंजुळा, पाजळ आपुला विळा

मंजुळा, पाजळ आपुला विळा


नीच नीतीचा कापू गळा, त्या रक्ताचा लेवू टिळा
मंजुळा, पाजळ आपुला विळा न् चल गं रणामधी
।। धृ ।।
ढोल ढपुले पुरुष आपुले बांगडीत गुंतले गं
उरले सुरले हत्तीवाले सांगडीत गुंतले गं
जोम तयांचा झाला शिळा, कुठे दिसेना झेंडा निळा
मंजुळा, पाजळ आपुला विळा .... 
।। १ ।।
तरुण आपले बसू लागले लपून लुगड्यामधी गं
केस तयांचे फसू लागले बाळ्या बुगड्यामधी गं
कोण मिशीला देऊन पिळा, वाचविल गं आपुल्या कुळा
मंजुळा, पाजळ आपुला विळा .... 
।। २ ।।
पहा सरीने करी घेतली जुनी पुराणी सुरी गं
अन्यायाने चिडून उठली पुरी पेटली उरी गं
म्हणे चला गं अडवू छळा, भीमरायाचा राखू मळा
मंजुळा, पाजळ आपुला विळा .... 
।। ३ ।।
गायनातल्या रण मैदानी गाव गर्जना करी गं
प्रसंग येता असाच नेता पळून जय घरी गं
काही करी ना वामन खुळा, संघ तयाचा ठरला लुळा
मंजुळा, पाजळ आपुला विळा .... 
।। ४ ।।  

कवि / गायक : वामन दादा कर्डक

No comments:

Post a Comment

Please do not enter spam link in the comment box.

बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना

  बुद्धा सवेच बा भीमा बुद्धा सवेच बा भीमा तुला वंदना  शाक्य कुला आणि तुझ्या कुला वंदना                                          ...