भीम युगाचं तांबडं फुटलं
शेटानं भटानं गुपित काटानं, साऱ्याच देशाला लुटलं
मनूच्या नादानं जातीय वादानं हीनाला दिनाला पिटलं
भीम युगाचं तांबडं फुटलं, तवा देशाचं गिऱ्हान सुटलं
।। धृ ।।
आर्य आपल्या देशात आले, इथलंच खाऊन माजोरी झाले
मनू नावाचा आर्य नेता, मनानं भारीच कपटी होता
द्राविडी लोकांशी नमतं घेऊन, हळूच इथं स्थायिक होऊन
चातुर्वर्ण स्थापन केला, मालक इथला गुलाम केला
आर्य नीतीनं देवाच्या भीतीनं, द्राविडी रक्त गोठलं
कपट करून देशाच्या धान्याला जातीच्या दरीत लोटलं
भीम युगाचं तांबडं फुटलं, तवा देशाचं गिऱ्हान सुटलं
।। १ ।।
सुपीक सिंधू नदीचं खोरं, पोसत होतं द्राविडी पोरं
जाती पातीनं कहर केला, भावाला सोडून भाऊ हि गेला
हजारो वर्षे यातच गेली, परी कुणाला जग ना आली
शेखांची होणांची चंगळ झाली, त्या क्षात्रपांनी लुटमार केली
लुटमार अशीच केली कि सिंधू नदीचं पाणी आटलं
भुकेल्या तान्हेल्या जीवांनी एका युगाचं अंतर काटलं
भीम युगाचं तांबडं फुटलं, तवा देशाचं गिऱ्हान सुटलं
।। २ ।।
खैबरमधून मोगल आले, दिल्लीत गदिनाशीनं झाले
इंग्रजांनी कमी ना केले, सोनं - चांदी सारं लुटून गेले
गोष्टं भीमाच्या ध्यानात आली, चातुर्वर्णाची खांडोळी केली
लोकशाहीची घटना दिली, तवाच या देशाची पनवती गेली
प्रतापसिंगा भीमाचं लिहिणं साऱ्या जगाला पटलं
भीमानं कसलं म्हणून हे सारं बुद्धाचं शिवार नटलं
भीम युगाचं तांबडं फुटलं, तवा देशाचं गिऱ्हान सुटलं
।। ३ ।।
कवि / गायक : प्रतापसिंग दादा बोदडे
No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box.